एकाधिकेन पूर्वेण |
एकाधिकेन पूर्वेणI
प्रिय निशिकांत,
आपलं आपलं असं म्हणून आपण ज्या संस्कृती,
संस्कृत, वेद, गणित यांबद्दल बोलतो, त्याबद्दल आपल्याला खरंच किती माहिती आणि जाणीव
आहे, असा मला प्रश्न पडतो. समजून घ्यावं आणि आत्मसात करावं असं बरंच काही सापडेल
हे माहीत असतं एका बाजूला, तरीही जुनं काहीतरी नव्याने शोधण्याचा उत्साह मात्र
उफाळून येत नाही. एका अर्थाने कष्टाचं आणि जिद्दीचंच काम हे. पण समजावून घ्यायचं
ठरवलंच, तर कुठे पुराण वगैरे वाचत बसावं किंवा जंगलात जावं लागेल असंही नाही.
कुठूनतरी सुरुवात करायची आणि सोपं असलेलं सोपं असतानाच समजावून घ्यायचं.
तर झालं असं..
सुट्टी म्हणल्यावर घरच्यांनी सालाबादप्रमाणे घर आवरण्याची जबाबदारी माझ्या
खांद्यावर टाकली आणि जुन्या कपाटांनी नि:श्वास सोडला. त्यातच मला वैदिक गणिताची
जुनी, अगदी पिवळी पडलेली पुस्तकं सापडली. हे गणित म्हणजे काहीतरी भारी असतं आणि
जादू केल्यासारखी वेगात समीकरणं सोडवणारी माणसं असलंच गणित वापरतात, हे माहीत
होतं; पण आजपर्यंत नेटाने ते संपूर्ण समजावून घेतलं, असं मात्र झालं नाही. माझं
लक्ष वेधलं गेलं ते वेगळ्याच गोष्टीकडे.. त्या पुस्तकांतल्याच एका भागाच्या
मलपृष्ठावर एका शालाप्रमुखाचं मनोगत थोडक्यात दिलं होतं आणि त्या शाळेच्या
नावापुढे लिहिलं होतं.. सेंट जेम्स स्कूल, जिथं सर्व विद्यार्थ्यांना ‘संस्कृत’
आणि ‘वैदिक गणित’ हे विषय अनिवार्य आहेत. तसं मला आश्चर्यच वाटलं, ज्या
ब्रिटिशांनी आपल्याला इंग्रजी शिक्षण दिलं, त्यांच्या लंडनमध्ये आपले (आपण
दुर्लक्षिलेले) विषय आणि तेही अनिवार्य..! मग काय, लगेच google केलं Saint James school. त्यांचे ते गीतेचे
श्लोक म्हणतानाचे video पाहून आणि वैदिक गणिताचा curriculum पाहून खजीलच झाले रे मी! म्हणूनच मी एकलव्य होण्याचं
ठरवलंय. Netवर search केलं पण संपूर्ण वैदिक
गणित कुठेच मनासारखं मिळेना. म्हणलं, पुस्तकं आहेत तर आपणच सुरू करू. ह्या self-course मध्ये तुलाही सामील
करून घ्यावंसं वाटलं, तशीही तुझी आकडेमोडीशी खास दोस्ती नाही, हे मला माहीत आहे.
असं समज, तुझी भीती घालवण्याचाच हा उपक्रम आहे. पण self-course हं crash course नव्हे, दोन मिनिटांत आकाश निळ्याचं लाल होणार नाही,
हे लक्षात घे.
सुरूवात कुठून करावी म्हणून पुस्तक चाळलं तर, आपण
वापरत असलेली जुनीच trick सापडली. ते वैदिक गणितातलं एखादं
सूत्र असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. ही trick म्हणजेच एककस्थानी 5 असणार्या संख्यांचे वर्ग करणे.
हे सूत्र असं – ‘एकाधिकेन
पूर्वेणI’ ह्याचा मराठीतला अर्थ
असा की, आधीच्या संख्येत एक मिळवून. मराठीवरूनसुध्दा फारसा अर्थबोध होत नाही आणि
म्हणूनच ही सूत्रं उलगडणारे स्वामी भारती कृष्ण तीर्थ यांच्याबद्दल मला अतीव आदर
वाटतो.. याठिकाणी मला भरून आलेलं आहे. तर मुद्दा असा –
यात वर्ग करण्यापूर्वी जिचा वर्ग करायचा आहे, त्या
संख्येचे दोन भाग करायचे. एक भाग म्हणजे नुसता एककस्थानचा 5 आणि दुसरा भाग म्हणजे
उरलेली संख्या. आता उरलेली संख्या आणि क्रमाने येणारी त्यापुढची संख्या यांचा
गुणाकार करायचा.. हा गुणाकार म्हणजेच आपल्या उत्तरातील डावा भाग. उत्तरातील उरलेला
भाग म्हणजे आपल्या 5 चा वर्ग 25. उदाहरणावरून बघू.
35 चा वर्ग. यात एक भाग म्हणजे 3 आणि दुसरा 5.
उत्तराचा डावा भाग = 3 x (3 + 1) = 3 x 4 = 12
उत्तराचा उजवा भाग = 5 चा वर्ग = 25
उत्तर = 1225.
आता 125 चा वर्ग पाहू.
12 x 13 = 156
म्हणून 15625 हे उत्तर.
205 चा वर्ग 42025.
495 चा वर्ग 245025.
आली की नाहीत उत्तरं अगदी एका ओळीत!
तू स्वत:च खात्री करून पाहा ना यांचे वर्ग करून..
1] 75
2] 95
3] 135
4] 185
5] 10005
6] 1905
आणि ती सोडवून मला mailच कर.
तुझी,
ऋचा.
याप्रमाणे उत्तर 5625 ...
ReplyDelete